पुण्यात मतदारांची रवींद्र धंगेकर, वसंत मोरेंना पसंती; तर मुरलीधर मोहोळ नापसंत यादीत

pune lok sabha 2024
pune lok sabha 2024

Pune Lok Sabha  | लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या ४८ मतदारसंघांतील सव्वानऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून मतदारांची सर्वाधिक संख्या पुणे जिल्ह्यात आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ८२ लाख ८२ हजार ३६३ मतदार आहेत.

२१ विधानसभा मतदारसंघ असलेल्या पुणे जिल्ह्यात भाजपला केवळ पुणे शहरात कमळ चिन्हावर लढणारा उमेदवार मिळाला आहे. शिरूर, बारामती, मावळ लोकसभा मतदारसंघात भाजपला उमेदवार देता आले नाही. कार्यकर्त्यांनी आग्रह करूनही आणि पुणे जिल्ह्यात वर्चस्व निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहिलेल्या भाजपला महायुतीमुळे शांत बसण्याची वेळ आली आहे.

पुणे जिल्हातील प्रमुख लढती 

पुणे लोकसभा – रवींद्र धंगेकर ( काँग्रेस ) विरुद्ध वसंत मोरे ( वंचित आघाडी) विरुद्ध मुरलीधर मोहोळ ( भाजप )

शिरूर लोकसभा – अमोल कोल्हे ( शरद पवार गट ) विरुद्ध शिवाजीराव आढळराव-पाटील ( अजित पवार गट )

मावळ लोकसभा – संजोग वाघेरे ( ठाकरे गट ) विरुद्ध श्रीरंग बारणे ( शिंदे गट )

बारामती लोकसभा – सुप्रिया सुळे ( शरद पवार गट) विरुद्ध सुनेत्रा पवार ( अजित पवार गट )

पुणे लोकसभेत मतदारांची पसंती 

पुणे लोकसभा मतदार संघ अनेक दिवसापासून चर्चेचा विषय ठरला आहे. राजकीय पक्षाचे पुणे लोकसभेसाठी उमदेवार कोण असणार याची उत्सुकता अगोदर पासून पुणेकरांना होती.

पुण्यात रवींद्र धंगेकर (काँग्रेस ), वसंत मोरे ( वंचित आघाडी), मुरलीधर मोहोळ ( भाजप ) यांच्यात प्रमुख लढत होणार आहेत. पुण्यात उमेदवारी मिळवण्यासाठी अनेक नेते आग्रही होते परंतु पक्षाने या तिन्ही नेत्यांना कौल दिला.

पुण्यात सोशल मीडिया आणि बातम्यांखाली येणाऱ्या कंमेंटचा महाराष्ट्र देशाच्या टीमने आढावा घेतला. त्यावेळी रवींद्र धंगेकरांना पुणेकरांनी पसंती दिली आहे, तर क्रमांक २ चा उमेदवार म्हणून वसंत मोरेंना पसंती मिळताना दिसत आहेत. हे दोन्ही उमेदवार विकासाचे राजकरण करत असल्याचे पुणेकर सांगत आहे. तर मुरलीधर मोहोळांविरोधात नाराजीचा सूर पुणेकरांमध्ये आहे.

‘हक्काचा माणूस ‘ अशी ओळख आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांची असून त्यांनी गेल्या काही महिन्यातच लोकांमध्ये जाऊन आपली वेगळी ओळख देखील निर्माण केली आहे. महागाई, शहरात वाढलेली वाढती गुन्हेगारी, ड्रग्ज अशा विविध प्रश्नांवर धंगेकर यांनी आवाज उठविला आहे. तसेच कसबा भागातील विविध विकास कामे यानिमित्ताने ते नागरिकांशी जोडलेले असतात.

वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत वंचित बहुजन आघाडी कडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.  पुणे महापालिकेमध्ये १५ वर्षाच्या नगरसेवक पदाच्या काळात मोरेंनी चांगले काम केले असल्याचे पुणेकर सांगत आहेत. मोरेंना सोशल मीडियावर तुफान फॅन फॉलोवर्स आहेत.

तर मातब्बर नेते सोबत असून ही मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीका होतांना दिसत आहे. ५ वर्षे महापौर असताना काय कामे केले? असा सवाल पुणेकर विचारत आहेत. फक्त नरेंद्र मोदींच्या नावावर मत मागत असल्याचा आरोप पुणेकर करत आहेत.  तर मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून पुण्यातील मराठा समाज भाजपवर नाराज आहे, त्याचा परिणाम मुरलीधर मोहोळ यांच्यावरही होतांना दिसून येत आहे.

भाजप लोकसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी जगदीश मुळीक, स्वरदा बापट, सुनील देवधर, धीरज घाटे आणि मुरलीधर मोहोळ यांच्यात रस्सीखेच होती. जगदीश मुळीक यांना लोकसभेची उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी आपली नाराजी उघड केली. पण फडणवीसांच्या मनधरणी नंतर मुळीक शांत असले तरी मोहोळांना किती साथ देतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघात ब्राह्मण समाजाचा वरचष्मा राहिला आहे. ब्राह्मण समाज तसा भाजपचा पारंपरिक मतदार मानला जातो, मात्र ब्राह्मण समाजाचा विचार न करता उमेदवार दिला गेला आहे. मेधा कुलकर्णी यांना राज्यसभा दिल्याने ब्राह्मण समाजाला खूश केल्याचं सांगितलं जातंय, मात्र तरीही गिरीश बापट यांच्या सून स्वरदा बापट यांना डावलून मराठा चेहरा असलेल्या मुरलीधर मोहोळ यांना लोकसभेची उमेदवारी दिल्याने पुण्यातील ब्राह्मण समाज त्यांना स्वीकारतो की नाही, हे पाहणे महत्वाचे ठरेल.

शहरात भाजपकडे अनेक मोठमोठे नेते आहेत, वरकरणी सगळे एकमेकांशी गोडगोड वागताना दिसत असले, तरी एकमेकांवर कुरघोडी करतांना दिसत असतात. एकमेकांचे पाय ओढण्याच्या नादात आणि पक्ष अंतर्गत वादामुळे भाजपला ही पुणे लोकसभेची जागा गमवावी सुद्धा लागू शकते.

पुण्यात भाजपचा बाल्लेकिला अशी ओळख गिरीश बापट यांनी केली होती. बापटांनी पुण्यात पक्षाची उत्कृष्ट बांधणी केली होती. त्यानंतर चंद्रकांत पाटलांना पक्षाची बांधणी करण्यात अपयश आले.

Who Is Dhangekar? म्हणून काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकरांना हिणवणाऱ्या चंद्रकांत पाटलांना पुण्यातील मतदारांनी कात्रजचा घाट दाखवला होता. अति विश्वासात असलेल्या भाजपच्या नेत्यांना पुणेकर साथ देतील का? हे येणाऱ्या काळात कळेल.

मुरलीधर मोहोळांविरोधात बॅनरबाजी

पुणे महापालिकेच्या परिसरामध्ये माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात आली. या बॅनरमध्ये म्हटलं होतं की, स्टॅंडिंग दिली, महापौर केलं, सरचिटणीस पण केलं, आता खासदारकी पण? आता बास झालं, तुला नक्की पाडणार. कष्टाळू भाजप कार्यकर्ते. अशा मजकुराचा बॅनर लावल्याने पुणे भाजप मधील वाद चव्हाटयावर आला होता.