सत्यशोधक | समस्त स्त्री वर्गाला शिक्षणाचा योग्य मार्ग दाखवणारे आणि संघर्ष, विरोध पत्करून प्रत्येक स्त्री शिकलीच पाहिजे असा आग्रह धरून स्वतः या शिक्षणाच्या यज्ञकुंडात उतरलेले महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित भव्यदिव्य ‘सत्यशोधक’ या चित्रपटाचे लूक रिव्हील पोस्टर लॉन्च करण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी आलेल्या टिझरमुळे या चित्रपटाची खूप चर्चा झाली होती आणि सर्वामध्ये चित्रपटात विषयी खूप उत्सुकता निर्माण झाली, तसेच महात्मा ज्योतिराव फुले यांच्या भूमिकेत कोण आहे, याचीही उत्सुकता प्रेक्षकांना होती, आता ती प्रतिक्षा संपली आहे. येत्या नवीन वर्षात सावित्रीबाई फुले यांची जयंती ३ जानेवारीला आहे, त्याचे औचित्य साधून , म्हणजेच ५ जानेवारी, २०२४ रोजी हा चित्रपट महाराष्ट्रभरात प्रदर्शित होईल.
नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘सत्यशोधक’ या चित्रपटाच्या पोस्टरवर अभिनेते संदीप कुलकर्णी झळकले आहेत. महात्मा ज्योतिरावांसारखे हुबेहुब दिसणाऱ्या संदीप कुलकर्णी यांच्या लूकची चर्चा सध्या चित्रपटसृष्टीत होत आहे. वेशभूषा आणि रंगभूषा अगदी योग्य जमून आल्याने खरेच महात्मा ज्योतिराव फुले समोर आहेत की काय असा भास होतो. त्यामुळे अभिनेत्याची योग्य निवड आणि लूकचा संपूर्ण अभ्यास करूनच ही भूमिका साकारली गेल्याचे स्पष्ट होत आहे.
‘विद्येविना मती गेली, मतिविना निती गेली…’ अशा कठोर शब्दांत शिक्षणाचे महत्त्व सांगणाऱ्या म. ज्योतिरावांच्या आयुष्यातील संघर्ष आता मोठ्या पडद्यावर पहिल्यांदाच साकारणार आहे. अभिनेते संदीप कुलकर्णींसह राजश्री देशपांडे, गणेश यादव, सुरेश विश्वकर्मा, रविंद्र मंकणी ही कलाकार मंडळी चित्रपटात झळकतील.
या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. इंग्लंडमधील पेन्झान्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट बायोग्राफीकल फिचर फिल्म या पुरस्काराने तर, जर्मनीत होहे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये द्वितीय सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा सन्मान या चित्रपटाला मिळाला.
समता फिल्म्स निर्मित, अभिता फिल्म्स प्रॉडक्शन प्रा. लि. प्रस्तुत आणि निलेश जळमकर लिखित-दिग्दर्शित , संकल्पना – राहुल तायडे, वैशाख वाहुरवाघ सत्यशोधक चित्रपटाचे निर्माते प्रविण तायडे, आप्पा बोराटे, भिमराव पट्टेबहादूर, सुनील शेळके, विशाल वाहूरवाघ हे आहेत, तर सहनिर्माते राहुल वानखडे, बाळासाहेब बांगर, हर्षा तायडे, प्रतिका बनसोडे, प्रमोद काळे हे आहेत.
शिवा बागुल आणि महेश भारंबे हे कार्यकारी निर्माते आहेत. निर्मिती मध्ये निखिल पडघन, देवानंद मोहोड, मंगला वानखडे आणि निता गवई याचे मोलाचे योगदान आहे. विशेष म्हणजे रिलायन्स एंटरटेंनमेंट मार्फत हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होईल. ‘सत्यशोधक’ हा चित्रपट ५ जानेवारी, २०२४ रोजी प्रदर्शित होईल.